भाजप मंत्र्याच्या बेताल वक्तव्या विरोधात आक्रोश निषेध मोर्चा; अकलूज कडकडीत बंद
अकलूज (युवापर्व) : काही दिवसापूर्वी महामानवा बद्दल आक्षेपार्ह व निंदनीय व्यक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोशारींना पदमुक्त करावे,मंत्री चंद्रकांत पाटील यांचेवर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी करत आज सर्व पक्ष व संघटनाच्या वतीने निषेध मोर्चा काढून अकलूज शहर कडकडी बंद ठेवण्यात आले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेबद्दल आपत्तीजनक वक्तव्ये केल्यामुळे तसेच राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत.अकलूज मध्येही सदर घटनेचा निषेध व्यक्त करत बहुजन समाजातील सर्व पक्ष व संघटनाच्या वतीने अकलूज शहर बंद ठेवुन निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातुन सुरुवात करुन महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत शहरातील प्रमुख मार्गावरुन हा निषेध मोर्चा आंबेडकर चौकात आल्यावर येथे निषेध सभा घेवुन उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील याचेबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्यामुळे त्याचेवर अट्रासिंटीचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी आपत्तीजनक वक्तव्ये केल्याने त्वरीत पदमुक्त करावे अशां मागण्या केल्या आहेत.