रेशनधारकांच्या हक्काच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका
प्रांताधिकारी यांचे पुरवठा विभागाला तात्काळ पंचनामा आणि चौकशीचे आदेश
अकलूज (युवापर्व) : माळशिरस तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून eKYC च्या नावाखाली रेशन धारकांना माल वितरीत केल्याचे फिंगरप्रिंट घेऊन रेशनधारकांना काहीही माल न पुरवता रेशनधारकांची फसवणूक केल्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या नुकताच निदर्शनास आलेला आहे. यासंबंधी अकलूजमधील अनेक ग्राहकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधत रेशनचा माल मिळाला नसल्याची कैफियत मांडली होती. याविषयी चौकशी करण्यासाठी ऑनलाइन ला पाहिले असता मालाचे वितरण केल्याचा डेटा फीड केल्याचे दिसत असुन प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना मालच मिळाला नसल्याची भयानक परिस्थिती आहे.
रेशन वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने निशुल्क eKYC प्रक्रियेचा अवलंब केला आहे. परंतु माळशिरस तालुक्यात eKYC च्या नावाखाली रेशनधारकांचे फसवणूकीने फिंगरप्रिंट घेत त्यांच्या जुलै महिन्याच्या मालाचे अजुनही वाटप न करता रेशनचा काळाबाजार करण्याचा प्रकार समोर येत आहे. शासन निर्णयाप्रमाणे ग्राहकांचे फिंगरप्रिंट घेतल्याक्षणी त्यांना मालाचे वितरण होणे बंधनकारक असताना त्यांना eKYC चे नाव पुढे करीत त्यांची फसवणूक केलेली आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी विचारणा केल्यास अजुन माल आला नाही असे फसवणूक करणारे उत्तर त्यांना दिले जात आहे. हा निव्वळ रेशनचा काळाबाजार करण्याचा गंभीर प्रकार असुन शासनाच्या उद्देशाला केराची टोपली दाखवत रेशनधारकांच्या हक्काच्या मालावर डल्ला मारण्याचा प्रकार असल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रांताधिकारी यांचेकडे मोर्चाच्या निवेदनाद्वारे ग्राहकांना जुलै महिन्याचा हक्काचा माल तात्काळ वितरीत करण्यात यावा आणि यातील संबंधितांवर कारवाई व्हावी अशा मागण्या केल्या. तसेच eKYC प्रक्रिया निशुल्क असतानाही यासाठी माळशिरस तालुक्यात 100, 200, 300 रुपयांची मागणी केली जात असल्याच्या घटना समोर आलेल्या असुन अशा दुकानदारांवरही कारवाई करण्यात यावी अशीही मागणी या दिनांक ०२ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये निघणाऱ्या “रेशनधारकांच्या मोर्चा”चे निवेदन देताना केलेली आहे.