Uncategorized

मेणबत्त्या कुठपर्यंत जाळायच्या……

We want justice,we want justice..save the saviours…. गेली सहा सात दिवस या घोषणा,banner, मोर्चा, candle march सर्व देशभरात सुरु आहे.. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पुर्ण झाली तरी आपण आज मुलींच्या सुरक्षेसाठी मोर्चे काढतोय.. हे आपले दुर्भाग्य… बेटी बचाव.. बेटी पढाओ… मोठ्या जल्लोषात सुरु आहे.. पण बेटी शिकतेय, प्रगती करतेय पण आपल्याच गावात, शहरात, राज्यात, देशात ती किती सुरक्षित आहे?… तिचं राहणं, तिचे कपडे, तिचं उशिरा येणं, तीचा मेकअप, तिचे मिञ.. या सगळ्या गोष्टीवर कायम नजर ठेऊन राहणारे आपलेच लोक, समाज समाज म्हणून आपणच त्यात असणारे सगळे… कधी आपला मुलगा, त्याचे मिञ, त्याची संगत, त्याचा दृष्टीकोन यावर कधी विचार करणार…..

पालकांनी मुलींना जितक्या restrictions देतो तितक्याच त्या आपल्या मुलांना द्यायला पाहिजे… माझा मुलगा कशा चार पोरी फिरवतो.. बुलट उडवतो.. थार गाडीत फिरतो…. याचा वृथा अभिमान बाळगणारे पालक काही कमी नाहीत…. शिकण्याच्या नावाखाली महागडे फोन घेणारी मुले दिवस रात्र त्यात नेमकं काय बघतात, हाताच्या बोटावर अश्लील चित्रपट, सिरीज, पोर्न व्हिडीओ पाहून तशीच कृत्य करणारी मुले आपल्याच आसपास आहेत हे सोयीस्कर रित्या डोळ्या आड होतायत,त्यांच्या चुका झाकून झाकून तो कधी असाच एखादा गुन्हा करेल हे कळणार नाही….. एकतर्फी प्रेम, चाळवलेली नजर, घाणेरड्या गप्पा, मित्रांची संगत, अशी कृत्य करायला भाग पाडणारी मिञकंपनी, मजा मजा म्हणून केलेली कृत्य कधी व्यसनात रूपांतर होइल सांगता येत नाही.. असा एखादा गुन्हा घडतो तेव्हा असे कित्येक गुन्हे त्या नराधमांनी आधी केलेले असतात,पचवलेले असतात, त्यामूळे पिपासू झालेलं, पिसाटल्यासारख तेच तेच कऱण्यात वेळ घालणारी ही टोळकी सराईत होतात आणि मग अशा अनेक निर्भया…. निष्पाप मुली यांची शिकार होतात….. आणि एखादी घटना समोर आली की निघाला कँडल मार्च, अधिवेशनात आरोप, प्रत्यारोप, राजकारण, दुसऱ्यांवर दोषारोप,.. अरे कठोर कायदे करा ना? घाला गोळ्या अशांना जागेवर… मेणबत्त्या जळण्यापेक्षा निर्घृण अत्याचार आणि खून करणाऱ्याला जाळा एकदा त्याच जागेवर…. नाही होणार असं कधी… मनातला संताप आणि आक्रोश आहे म्हणून असा विचार आला डोक्यात.. पण किमान तातडीने न्याय, निर्णय घेऊन दया ना त्याला फाशी….. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षांनी सुद्धा आपलीं मुलगी सुरक्षित नाही.. आजही त्याच जुन्या धीम्या गतीने न्याय द्यायचा का?…. अशा किती निर्भया अजून होऊ द्यायच्या…. उरण ची घटना डोक्यातून जात नाही तोपर्यंत हे… फक्त बातम्या.. बातम्या.. सीबीआय कडे सोपवा.. याच्याकडे दया त्याच्याकडे दया…. शेवटी बातम्या थंडा वतात, लोकं विसरतात, कामाला लागतात… आरोपी सुटतात, काहींना कमी वय म्हणून सुट मिळते… पुन्हा तो गुन्हा करायला तयार… आता तर सुटून आलो म्हणून आणखी रुबाब, आणखी माज…त्यांच्या वागण्याला काय जाब… कुणाला वेळ.. पुन्हा एखादी निर्भया…

एक लेखिका म्हणून संवेदनशील मनाने फक्त लिहण्यासाठी नाही हे… एक आई…. मुलींची आई… त्यांना शिकायला बाहेर पाठवणे… अशाच मनात भीती असणाऱ्या अनेक आई , त्यांची मानसिकता…. वडिलांना आपल्या मुलींची असणारी काळजी… रडता येत नाही… बोलता येत नाही… असा बाप… लेकीसाठी कासावीस असतोच मनातून… त्या सगळ्याच्या मनातील या भावना… दोन डॉक्टरांची मी आई…. आज पुरती हेलावून गेले….. लिहायचं असून हात थरथरत होते…. पण राहवेना… म्हणून हा लेखन प्रपंच……… नकोत हो नुसत्या या एक दोन दिवस पेटणाऱ्या मेणबत्त्या… सांगा ना आपल्या मुलांना चांगल्या वाईट गोष्टी.. दया समज त्यालाही आपल्या मुलींना देतो तशीच.. बनवा ना मुलगा देखील संवेदनशील, कळू दया ना त्याला प्रेम म्हणजे फक्त ओराबडणे नसते… भावना हळुवार जपणं म्हणजे प्रेम…एकतर्फी बिक्तर्फी नसतंच प्रेम..प्रेम मनापासून करा..तिच्या जीवावर बेत णारे नको…जीव लावा… जीव घेऊ नका .. आईबाप म्हणून कधी या गोष्टी पण सांगा हो आपल्या मुलाला, माझा मुलगा असा नाहीच.. असा विश्र्वास हवाच मुलांवर पण तरीही बाकी गोष्टींची जशी चर्चा होते ना तशीच मिञ म्हणून वयात आलेल्या मुलाला समजून सांगाच या गोष्टी… नक्की परिवर्तन होईल मुलांच्या विचारांत…. सुदृढ मन, निकोप विचार, प्रेमाची योग्य परिभाषा कळेल त्यांना.. कदाचित यातून त्यांच्या एखाद्या मित्राच्या विचारांमध्ये बदल करण्यात आपल्या मुलाचा मोठा वाटा असेल…… त्यातूनच वाचवतील ते अशा निर्भया होण्यापासून एखादीला…. आज रस्त्यावर उतरणाऱ्या मुलींबरोबर अनेक मुलं आहेत.. ते ही ओरडत आहेत जिवाच्या आकांताने…. देतायत साथ आपल्या मैत्रीणीना, भगिनींना… संवेदनशील मुले आहेतच की… त्यांच्याही डोळ्यात पाणी आहेच की….बोटावर मोजण्या इतक्या वाईट प्रवृत्तीच्या मुलांमुळे चांगली सुसंस्कृत मुले देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकतात … त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो…. गव्हाबरोबर किडे रगडल्या जातात.,….. सगळं दुष्चक्र….. कित्येक अतिशय हुशार असणाऱ्या मुली कदाचित शिकायला बाहेर पडणार नाहीत अर्थात पालक भीतीपोटी पाठवणार नाहीत… एक अत्युच्च बुद्धिमत्ता असणारी लेक पुन्हा चूल मुल यामध्ये अडकून पडेल….वाचवायला हवं हे आपण…..

डॉ. उषा भोईटे पवार, निमगाव केतकी, इंदापूर.9890376649 लेखिका,व्याख्याता, इतिहास संशोधक, शिक्षणतज्ञ

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button