अकलूज(युवापर्व) : शहरात मुस्लिम समाजाच्या भागात वर्षांनुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित असून अल्पसंख्यांकांना त्याचे हक्क,अधिकार व योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेकदा दंडुकेशाही केली गेली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.दयानंद गोरे यांच्या माध्यमातून मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांकाचे विकासाबाबत व उन्नतीकरता विविध शासकीय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी ; यासाठी जनशक्ती परिवर्तन विकास आघाडी आग्रही असल्याचे समन्वयक मोहसिन शेख यांनी निवेदनाद्वारे मत व्यक्त केले आहे.
शहरातील अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम समाजाच्या उन्नती करता विविध मागण्यांचे निवेदन यावेळी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.दयानंद गोरे यांना जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीचे मोहिद्दीन शेख,इन्नूसबाबा सय्यद, फारुक शेख, समीर काझी,वसिम पटेल आदींच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आले.
अल्पसंख्याक समाजातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांकरीता मेक इन इंडिया अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात यावेत.तसेच मुस्लिम समाजातील उच्च माध्यमिक व पदवीधर युवकांसाठी मोफत स्पर्धा परिक्षा केंद्र व मार्गदर्शन शिबिराची सुरूवात करण्यात यावी. सुशिक्षित-बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे राबवण्यात यावेत. महिलांकरता शिवण क्लास,ब्युटी पार्लर व इतर रोजगार निर्मित प्रशिक्षण शिबीरे राबवण्यात यावेत. नीरा नदी लगत असलेल्या ईदगाह मैदानास संरक्षण भिंत,नमाज पठण जागेत काँक्रिटीकरण व त्या परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने मुस्लिम दफनभूमी हद्दीत उपलब्ध मुख्य रस्ता लगतच्या जागेत भव्य व्यापार संकुल उभारण्यात यावे. यामुळे बहुसंख्य अल्पसंख्यांक युवकांना व्यापार संकुलाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीकरता प्रशासनाकडून सहकार्य लाभेल.
अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल भागात खड्डेमय रस्ते असून तात्काळ खड्डे काँक्रिटीकरण करण्यात यावे; अशा विविध मागण्या अल्पसंख्यांक हक्क दिनी केलेल्या असून नगरपरिषद प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा अल्पसंख्याक मुस्लिम समाज बांधव व जनशक्ती परिवर्तन विकास आघाडी यांच्याकडून करण्यात आली आहे.