अकलूज : अकलूज शहरातील प्रभाग क्र.०९ मधील आंबेडकरनगर मध्ये महिलांचे एक व पुरुषांची दोन अशी एकुण तीन शौचालयाचे तसेच महर्षी कॉलनी, इंदिरा नगर येथील २१ खोल्या शाळेपाठीमागील शौचालय अशी सार्वजनिक शौचालये असुन ती जीर्ण झाल्यामुळे दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या स्वच्छताविषयक समस्यांना येथील रहिवाश्यांना तोंड द्यावे लागते. पुरुष स्वच्छतागृहांतील दरवाजे तुटलेले व जीर्ण झालेले आहेत, छतावरील पत्र्याला गळती लागल्याने पावसाळ्यात वरून पाणी गळते. शौचालयाची गटार तुंबल्याने व शौचालयाच्या बाहेरील स्वच्छता नसल्याने त्याचा वापर करणाऱ्या व शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
या शहरात आंबेडकरनगर मधील महिला शौचालयाची अवस्था बिकट असुन घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसुन येते व ही घाण बाहेरील गटारीमध्ये येते. इतका त्रास सहन करूनही केवळ मजबुरीने या शौचालयांचा वापर स्थानिकांना करावा लागत आहे. ही शौचालये जीर्ण झाल्यामुळे प्रशासनाकडून स्वच्छतेच्या नावाखाली काही काम केले तरी मूळ समस्या कायमच राहिलेल्या आहेत. त्यामुळे नुसती किरकोळ डागडुजी केली तर मूळ प्रश्न तसेच राहतात म्हणुन नगरपरिषदेमार्फत त्वरीत प्रस्ताव तयार करून व निधीची तरतूद करून याठिकाणी स्वछताविषयक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवीन शहरी शौचालयांची बांधणी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अकलूज शहरच्या वतीने शहराध्यक्ष सुनील कांबळे, महासचिव सागर जगताप, संघटक शंकर पाटील, संघटक सूनका जाधव, संघटक कुंडलिक कांबळे, प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शुभम वाघमारे, अलविन खरात, दीपक चव्हाण, सुरज चव्हाण, संदीप निंबाळकर, देवा चव्हाण, संदीप चव्हाण व इतरांच्या वतीने करण्यात आली आहे.
त्याचबरोबर इंदिरा नगर येथील रस्त्याला खड्डे पडले आहेत त्यामुळे त्या खड्ड्यात पाणी साचून राहते त्याचेही चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे आणि गटारी तात्काळ स्वच्छ करण्यात याव्यात या मागण्यांचाही उल्लेख मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासोबत या विषयांवर चर्चा केली त्यावेळी त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला यामुळे येथील रहिवाश्यांच्या स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने कित्येक वर्षापासून प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.