एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांच्याबद्दल कार्यकर्त्यांची खदखद उघड
बार्शी : सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकांत २०१९ मध्ये एमआयएम पक्षात पर्यायी स्वरूपात उमेदवार ठरलेले फारूक शाब्दी यांचे १२ हजार मताधिक्यानी दारूण पराभव झाला. यानंतर सोलापूर शहर व जिल्हा अध्यक्ष पदी त्यांना पक्षाकडून जबाबदारी सोपवण्यात आली.या निवडीनंतर एमआयएमचे नगरसेवक माजी शहराध्यक्ष तौफिक (पैलवान) शेख यांच्या समर्थकांनी पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षातून बाहेर पडले. शाब्दी व पैलवान समर्थक असे दोन गट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पक्षांतर्गत संभ्रमावस्था झाल्याचे अनेक प्रामाणिक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्तांची मरगळ अवस्था झाली.
सोलापुर शहरा पाठोपाठ माळशिरस,बार्शी, सांगोला,माढा,पंढरपूर या ग्रामीण भागात पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते फारूक शाब्दी वर नाराज असल्याचे कालांतराने समोर आले आहे. वेळोवेळी बार्शीचे माजी तालुकाध्यक्ष गुलमहंमद आतार यांनी शाब्दी यांना बार्शी दौर्याची विनवणी केली असता त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने चक्क एमआयएम पार्टीचे हैद्राबाद स्थित राष्ट्रीय कार्यालय दारूस्सलाम गाठून खा.औवेसी यांना तक्रार केल्याचे पत्र आतार यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. याबाबत खा.औवेसी यांनी थेट प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.गफ्फार कादरी यांना संपर्क साधत शाब्दी यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित केले आहे.
आगामी सोलापूर महापालिका बरोबर ग्रामीण भागातील बार्शी,अकलूज,सांगोला,पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत पिडीत,वंचित मराठा,मुस्लिम-दलित समाज हा मोठ्या संख्येने असल्याने एमआयएम ने ताकद लावल्यास बहुतेक जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जिल्हाध्यक्ष हे फक्त ठराविक दिनीच सोलापूरला असतात व भेटण्यासाठी टाळाटाळ करत सोलापूर महापालिका हद्द सोडून त्यांना इतरत्र येण्यास वेळ नसल्याचे या पत्रात उल्लेख करण्यात आले आहे.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकिलभाई मुजावर यांना सोलापूर ग्रामीण दौरा करण्याबाबत चर्चा केली परंतु ते शाब्दी यांच्या जिल्ह्यात निर्णयात हस्तक्षेप करू शकत नसल्याने स्पष्ट संकेत दिले. पक्षश्रेष्ठीकडून सामान्य कुटुंबातील गरीब कार्यकर्तावर अन्याय होऊ नये ; म्हणूनच खा.औवेसी यांना नाईलाजाने जिल्ह्यातील घडामोडींचा पाढाच या पत्राद्वारे आतार यांनी समक्ष भेटून सादर केला आहे.