शहरातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत तात्काळ करा – रयत विद्यार्थी विचार मंच
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी
चिंचवड (युवापर्व) : पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पुर आला अनेकांच्या घरात पाणी शिरले.विशेषतः शहरातील नदीकिनारी राहणाऱ्या तसेच अनेक झोपडपट्टी भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शाळा चालू होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना मोठ्या कष्टाने सर्व शालेय साहित्य घेऊन दिले होते. परंतु पुराचे पाणी घरात आल्यामुळे सर्व शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे.पालकांना हे साहित्य पुन्हा नव्याने घेणे परवडणारे नाही.तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ज्या ज्या ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली होती ; अश्या भागांचा सर्व्हे करून पूरग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती जमा करावी अथवा महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन जारी करावी व या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक साहित्याची मदत उपलब्ध करून द्यावी.
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह याना निवेदन व मेलद्वारे मागणी करण्यात आली आहे .