पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शासकीय व खाजगी शाळेत शासकीय महापुरुषांच्या प्रतिमा लावा – रयत विद्यार्थी विचार मंच
पिंपरी-चिंचवड (युवापर्व) : शहरातील सर्व शासकिय व खासगी शाळेत महापुरुषांची प्रतिमा लावण्यात याव्यात याबाबत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त 1 (शिक्षण विभाग ) यांना निवेदन देण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय व खाजगी शाळा आहेत. या शाळांमध्ये आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. पण केवळ पुस्तकी शिक्षण घेणे म्हणजे ज्ञान नव्हे तर आज आपण या देशात कोणामुळे आहोत, आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार कोणामुळे मिळाला ? आपण पारतंत्र्यातून स्वतंत्र देशात कोणामुळे आलो ? आपल्याला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला ? आपला देश घडवण्यासाठी कोणी कोणी आपले आयुष्य समर्पित केले या सर्व गोष्टीची जाण विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाचे युग असताना सुद्धा खुप मोठी शोकांतिका आहे कि आजच्या विद्यार्थ्यांना व तरुणांना काही ठराविक महापुरुष सोडले तर इतर महापुरुष कोण आहेत ? त्यांचे नाव काय ? त्यांचे कार्य काय याबाबत आजिबात माहिती नसते अश्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनपासून आपल्या आदर्श महापुरुषांची ओळख होणे गरजेचे आहे. शहरात मोठ्या प्रमाणात शाळा आहेत परंतु काही ठराविक शाळा सोडल्या तर अनेक शाळा महापुरुषांच्या प्रतिमा लावत नाहीत महापुरुषांच्या जयंती साजरी करत नाहीत त्यामुळे विद्यार्थी देखील यापासून अनभिज्ञ राहतात तरी आपणास विनंती आहे कि आपण शहरातील सर्व खाजगी शासकीय शाळांना परिपत्रक काढून सर्व शासकीय महापुरुषांच्या प्रतिमा शाळेत लावण्यास आदेशित करावे. सदरचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त 1 (शिक्षण विभाग ) यांना निवेदन देण्यात आले आहे.