पोलीस उपअधीक्षक अरूण सावंत या माणदेशी भूमिपुत्रास राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर
पुणे(युवापर्व) : सध्या दक्षता पथक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे येथे कार्यरत असलेले अरुण साहेबराव सावंत पुळकोटी ता. माण जि. सातारा या माणदेशी रत्नाला 15 ऑगस्ट 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल महामहिम राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाल्याने पोलीस उपअधीक्षक अरुण सावंत यांच्यावर सामाजिक व राजकिय स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबात 13 मे 1966 रोजी पुळकोटी सारख्या ग्रामीण भागात जन्मलेले अरुण सावंत यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातच पूर्ण केले .तर उच्च माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज कराड तर महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर व पदवीवोत्तर शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी पूर्ण करून 5 जून 1989 रोजी पोलीस उपनिरीक्षक या पदावर पोलीस सेवेमध्ये भरती झाले. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आजपर्यंत पुणे शहर, ठाणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, नागपूर शहर, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती अशां विविध ठिकाणी कार्य बजावले असून सध्या कारागृह व सुधार सेवा पुणे येथे कार्यरत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक,पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने मजल मारली असून पोलीस विभागांमध्ये आत्तापर्यंत त्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 351 बक्षिसे मिळाली आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन 2020 मध्ये माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मान चिन्ह हे पदक मिळाले आहे. कोविड महामारीच्या कालावधीमध्ये सर्व पोलीस कर्मचारी व जनते करिता वैद्यकीय व इतर मदत वेळीच पोहोचवून अति उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली आहे. पोलीस विभागांमध्ये आत्तापर्यंत 34 वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे. त्याच्या या गौरवपूर्ण कार्य कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक सन्मानपूर्वक 15 ऑगस्ट 2023 रोजी बहाल करण्यात येणार आहे. त्यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक सन्मान जाहिर झाल्याने माण व माळशिरस तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.