‘माझी माती , माझा देश’ अभियाना अंतर्गत अकलूज नगरपरिषदेकडून माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान
अकलूज (युवापर्व) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तसेच विभाजन विभीषिका स्मृति दिनाचे औचित्य साधून अकलूज नगरपरिषदेच्या वतीने अकलूज परिसरातील माजी सैनिक व देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‘मेरी मिट्टी मेरा देश’ मिट्टी को नमन, वीरों को वंदन हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून या अंतर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शूरवीरांचा सन्मान व्हावा या उद्देशाने अकलूज येथील किल्ला शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील, गटविकास अधिकारी डॉ.विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, माजी सैनिक, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी झेंडावंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी होमगार्ड च्या वतीने पथसंचालन सादर करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ ग्रहण, शीला फलक अनावरण, अमृत वाटिका वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विभाजन विभीषिका स्मृति दिनाचे औचित्य साधून फाळणीच्या वेळेसचे दुर्मिळ फोटोचे मोफत प्रदर्शनही अकलूज नगरपरिषदेच्या वतीने भरवण्यात आले होते. यावेळी चंदनकुमार कोतिमिरे यांनी किल्ला शाळेसाठी साऊंड सिस्टीम भेट दिली. व गितांजली जाधव या विद्यार्थीनीने ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गाणं गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच 75 देशी झाडांचे वृक्षारोपण करून अमृत वाटिका लिंगायत वाणी दफन भूमी येथे तयार करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी दयानंद गोरे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा संपूर्ण इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा नवीन पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. अकलूज नगरीमध्ये 33 स्वातंत्र्य सैनिक व 28 माजी सैनिक असल्याचे सांगून त्यांनी 2 सैनिकांनी देशासाठी बलीदान दिले असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी जयसिंग खुळे, प्रशासकीय अधिकारी राजाराम नरूटे, सुनिल काशिद, बाळासाहेब वाईकर, आनंद जाधव, सोमनाथ कचरे, रोहित शेटे, नरेंद्र पाटोळे, आकाश ठोंबरे, शुभम काशिद,विजय कांबळे, शुभम काशिद आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास गायकवाड सर यांनी केले.