अकलूजचा बायपास रस्ता बनला “जैववैद्यकिय” कचऱ्याचे केंद्रबिंदू
अकलूज : जैववैद्यकिय व प्लास्टिक सारखे अविघटनशील टाकाऊ पदार्थाने शहरातील नदीकाट,बायपास रोड लगतच्या परिसरातील नागरीकांसह प्राण्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. अकलूज शहरातील लहान मुलांचे नामवंत बालरोग तज्ञ डाॅ.नितीन एकतपुरे यांच्या श्री हाॅस्पिटलने कॉलेज,बायपास रोड परिसरात मध्यरात्री आठवडाभर साठवलेला जैववैद्यकिय कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्याचे विडीओ फुटेजने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अकलूज नगरपरिषदेचे मावळते मुख्याधिकारी श्री.धैर्यशील जाधव यांनी अनेकदा याबाबत खासगी रुग्णालयांची बैठका घेवून वैद्यकीय वापरातील सिरिंज,औषधे,ड्रेसिंग पट्ट्या,सलाईन्स,इंजेक्शनच्या व्हाईल इ.अविघटनशील पदार्थ उघड्यावर टाकण्यास मनाई असल्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी ही विविध प्रसारमाध्यमांना नगरपरिषद प्रशासनास नदीकाठावर वारंवार जैववैद्यकीय कचरा दैनंदिन टाकला जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आणून दिले. सध्याचे नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी मा.दयानंद गोरे यांनी जैववैद्यकिय कचरा उघड्यावर टाकणारे रुग्णालयाचा परवाना रद्द करून वैद्यकिय कचरा टाकणार्यावर आळा घालण्यासाठी ठोस भूमिका बजावून लक्ष द्यावे.या खासगी हाॅस्पिटल कडून सतत जाणूनबूजून दाट लोकवस्ती परिसरात वैद्यकिय कचरा टाकून संसर्गजन्य रोग ,आजार पसरवून जादा पैसा कमावण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याची चर्चा शहरात नागरिकांतून दबक्या आवाजात सुरू आहे
जैव वैद्यकीय कचरा अधिनियम २०१६ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत असे बेशिस्तपणे उघड्यावर जैव वैद्यकीय कचरा टाकणारे अकलूजच्या श्री हाॅस्पिटलवर मा.जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्वरीत परवाना रद्द करत कारवाई करावी; अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रदुषण नियंत्रण विभागांतर्गत राज्यातील शासकीय व खाजगी रुग्णालय व दवाखान्यांची बायोमेडिकल वेस्टसाठी नोंदणी केली जाते. जिल्ह्यातील नोंदणीकृत रुग्णालये व दवाखान्यात निर्माण होणाऱ्या जैववैद्यकिय कचरा नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते.मात्र अकलूजला मेडिकल हब म्हणून ओळखले जात असताना येथेच प्रशासनाचे नियम धाब्यावर ठेवून काही नामवंत हाॅस्पिटल जैववैद्यकिय कचरांबाबत संवेदनशील नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.सदरील घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक, प्रदुषण नियंत्रण विभाग व स्थानिक नगरपरिषद प्रशासन काय भुमिका घेतात ? हे पाहण्यासाठी शहरवासिय आतुरतेने वाट पाहत आहे.