मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना तात्काळ बिनशर्त सुटका करण्याची मागणी
अकलूज शहर मुस्लिम समाज बांधवांकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अकलूज (युवापर्व) : दि.४ फेब्रुवारी रोजी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबई पोलिस व गुजरात एटीएस कडून अटक करण्यात आली. गुजरातच्या जुनागढ येथील धार्मिक कार्यक्रमात त्यांनी शेर शायरीच्या अंदाजात स्फूर्तीदायक भाषण केले. त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट धर्म,पंत, समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले गेले नाही. परंतु भाषणाचा छोटासा भाग उचलणे आणि संपूर्ण भाषणाचा संदर्भ न घेता प्रसारित करणे ही फॅसिस्ट शक्तींची जातीय तेढ निर्माण करण्याची आणि मुस्लिम समाजातील नेत्यांना लक्ष्य करण्याची जुनी सवय आहे.
मुफ्ती सलमान यांच्याकडून प्रक्षोभक भाषण व समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल असे कुठलेच वक्तव्य केले गेले नाही. गुजरात व महाराष्ट्र पोलिस,एटीएस टीम मुद्दामहून त्यांना लक्ष्य करून खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न व अटक करणे ही मुस्लिमांबद्दलची पक्षपाती वृत्ती दर्शवते,तर खरे द्वेष पेरणारे समाजात मुक्तपणे फिरत आहेत. तरी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांची सन्मानाने तात्काळ व बिनशर्त सुटका करावी या मागणी निवेदन उपविभागीय अधिकारी अकलूज यांना देण्यात आले. तसेच देशाचे महामहिम राष्ट्रपती,मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र,मा.मुख्यमंत्री,गुजरात यांना माहितीसाठी प्रत रवाना करण्यात आली आहे. तात्काळ मुफ्ती अझहरी यांची सुटका करावी अन्यथा समाजाकडून दि.९ फेब्रुवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल ; असा संतप्त इशारा उपस्थित असंख्य मुस्लिम समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.