शेजारच्या गावातील मतदार असलेल्या नेत्याने अकलूजच्या मुस्लिम समाजाचे नेते होण्याचे स्वप्न पाहू नये ! – मोहसिन शेख
अकलूज (युवापर्व): गेल्या दोन पिढ्यापासून शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करून खच्चीकरण करण्यास हेच तथाकथित नेते जबाबदार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तथा जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीचे समन्वय मोहसिन शेख यांनी व्यक्त केले आहे. अकलूज शहरातील मुस्लिम समाज दफनभूमी सुशोभिकरणाचे विकासकाम व्हावे यासाठी सतत प्रयत्न असंख्य सुजाण नागरिक,युवक,सामाजिक संघटना,विविध पक्षाचे सहकारी यांच्या सक्रिय सहभागामुळेच हे काम फत्ते झाले आहे. या कामाच्या पाठपुराव्याकरता वारंवार आंदोलन करणारे मुस्लिम बांधवांच्या विकास लढ्यास विरोध करणारे तथाकथित नेते तेव्हा कुठे होते ? त्यांनी दफनभूमी प्रश्न मार्गी लावण्यासाठी किती निधी आणला. केवळ आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचे धंदे बंद करा ; जनता तुमचे धुर्त राजकारण ओळखून आहेत. शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी विकासकामात सहकार्य करणे अपेक्षित होते; परंतु विरोधास विरोध समजून समाजाच्या निष्क्रिय नेत्याचे ऐकून समाजाच्या अस्मितेचा प्रश्न मार्गी न लावता समाजाला सतत गाजर दाखवण्याचे काम आजतागायत करण्यात आले आहे .
दफनभूमीच्या विकासकामात अडथळा आणणारेच सध्या भूमिपूजन करण्यास उतावीळ झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अनेक दशकांपासून प्रत्येक निवडणुकीत शादीखाना, दफनभूमी व ईदगाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांची दिशाभूल करणारा या लबाड नेत्याच्या आमिषास सुज्ञ समाज बांधव कधीच बळी पडणार नाही; असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला. नगरपरिषद प्रशासनास उशिरा का होईना दफनभूमी विकासकामे सुरू करण्यास शुभ महुर्त सापडल्याने द्विगुणी आनंद साजरा केला जात आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या विचारात घेवून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतंत्र दफनभूमीच्या जागेची मागणी करावी . याबाबत मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी प्रस्ताव सादर करण्याचे यापूर्वी आवाहन केलेले आहे .