कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करून जयंती साजरी करण्यात यावी – रयत विद्यार्थी विचार मंच
पिंपरी-चिंचवड : कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहा मध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत. ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरीत्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला.
भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडे ४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील रयत शिक्षण संस्थेच्या शाळा व महाविद्यालय आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील ते हजार विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. अशां या थोर व्यक्तिमत्वाची दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी जयंती आहे. जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पालिकेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा ठेऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात यावे.
तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती शासकीय व महानगरपालिका स्तरावर साजरी होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही करावी अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच ने लावून धरली आहे. यावेळी सदरील मागणीचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले.