अकलूजच्या मदिना मशिदीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
अकलूज : १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव ( यौमे आजादी ) निमित्ताने मदिना मस्जिद, काझी मोहल्ला अकलूज ता.माळशिरस यांच्या वतीने “स्वतंत्र दिन” सालाबादप्रमाणे काल उत्साहात साजरा करण्यात आला. देशाच्या स्वतंत्र दिनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पो.निरीक्षक अरूण सुगावकर साहेब,कॅप्टन शब्बीर शेख, आजी-माजी सैनिक व इतर प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला .यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष अकलूज पो.स्टेशनचे पो.निरीक्षक अरूण सुगावकर साहेबांनी कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित युवा पिढीने शिक्षणाची कास धरत स्पर्धात्मक जीवनात यश संपादन करुन देशाच्या विकासात हातभार लावावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात उपस्थित आपल्यातील असंख्य युवकांना भविष्यात अशां मंचावर मान मिळावा अशी अपेक्षा श्री.सुगावकर यांनी व्यक्त केली. या हर घर तिरंगा , स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अभियानांतर्गत कार्यक्रमात सहभागी अकलूज शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांना अकलूज पोलिस स्टेशनच्यावतीने पो.नि.सुगावकर यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर मदिना मशिदीचे मौलाना ज.महामूद आलम रजवी यांनी देशात हिंदू -मुस्लिम ऐक्य अबाधित राहो व सीमेवरील भारतीय सैनिक व त्यांचे कुटुंबीयांना अल्लाह सुखरूप ठेवो अशी सार्वजनिक दुआ करत प्रार्थना केली. तसेच या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
अकलूजच्या मदिना मशिद मुस्लिम समाजाच्या वतीने लहान मुले व मदरशांच्या विद्यार्थ्यांना पो.नि.सुगावकर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते जिलबी वाटप करून शाकाहारी भोजणाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू बांधवांचा पवित्र असा श्रावणमास असल्याने शाकाहारी भोजणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी शहरातील धार्मिक,शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील इतर मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरफराज शेख यांनी केले. यावेळी काझी मोहल्ला परिसरातील बहुसंख्य युवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.