कै.सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या ५ व्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ १७ विद्यार्थांना सायकल वाटप

माळशिरस(युवापर्व) : माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील कै. सजाबाई मल्हारी कर्णवर-पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प. संजीवनीताई शिंगाडे, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम रविवार दि.१२ मार्च रोजी बाळूमामा मंदिर गोरडवाडी येथे संपन्न झाला . कै.सजाबाई यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ परिसरातील गरजू १७ विद्यार्थ्यांना यावेळी सायकलचे वाटप करण्यात आले .

गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील मल्हारी कर्णवर पाटील यांच्या धर्मपत्नी कै. सजाबाई यांचे पाच वर्षापूर्वी दुःखद निधन झालेले होते. कर्णवर पाटील परिवारामध्ये सजाबाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांनी केलेले कार्य समाजाला आदर्शवत आहे. त्यांचा वसा आणि वारसा भागवत, शशिकांत, गोविंद हे चालवत आहेत. त्यांच्या पश्चात एकत्र कुटुंब पद्धती हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरत आहे. जेष्ठांच्या पुण्याईने कर्णवर-पाटील घराण्यातील हे तिन्ही रत्न सतत समाजहिताचे लोकाभिमुख उपक्रम राबवित असतात. या पुण्यस्मरण कार्यक्रमास सामाजिक,राजकिय व प्रशासकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
