माढा मतदारसंघात मानवी साखळीतून भारताचा तिरंगी नकाशा साकारून १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन
अकलूज (युवापर्व) : सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक चालू आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी दिसून आल्याने आपल्या माढा, माळशिरस मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत श्रीमती. विजया पांगारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २३/०४/२०२४ रोजी अकलूज नगरपरिषदेने विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल येथे मानवी साखळीतून भारताचा भव्य नकाशा तयार केला.
याकरीता शिवरत्न क्रिकेट अकॅडमी, समरजितसिंह अकॅडमी, साहिल स्पोर्ट क्लब, नगरपरिषद कर्मचारी, पंचायत समिती माळशिरस कर्मचारी, तसेच नागरिक अशा सुमारे ५०० जणांनी सहभाग नोंदवला. त्यावेळी उपस्थितांनी केशरी, पांढरी, हिरवा रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या.त्यातून तिरंगी भारत साकारण्यात आला आणि १००% मतदान करण्याबाबत संदेश प्रसारीत करण्यात आला. तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की,आपले माढा लोकसभा मतदार संघाचे दिनांक ७ मे २०२४ रोजी मतदान असून १००% नागरिकांनी सहभाग घेऊन माळशिरस विधानसभा अंतर्गत आपल्याला मतदानाची सर्वोच्च टक्केवारी दाखवायची आहे.