पिंपरी-चिंचवड मनपा शिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा – रयत विद्यार्थी विचार मंच
पिंपरी-चिंचवड(युवापर्व) : शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण शिक्षण विभाग निष्क्रिय झाला आहे. शिक्षण विभागात कसल्याही प्रकारचा ताळमेळ दिसून येत नाही. शिक्षण अधिकारी हे शिक्षण विभागात फार कमी वेळा उपलब्ध असतात.त्यांच्या या गैरहजेरीचा फायदा घेत शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांना कोणाची कसल्याही प्रकारची भीती राहिली नाही.तसेच शिक्षण अधिकारी यांचा वचक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दिसून येत नाही.
शिक्षण विभागात तक्रार घेऊन आलेल्या तक्रारदारांना तासनतास ताटकळत वाट बघत बसावे लागते,शिक्षण विभागात केलेल्या तक्रारी अर्जावर कोणतीही कारवाई होत नाही.शहरात अनाधिकृत शाळा बंद करण्याची वारंवार मागणी करून देखील अनधिकृत शाळा बंद होत नाहीत,खाजगी शाळांच्या मुजोरीबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही.तक्रारी अर्ज गुप्त राहत नाही त्याची माहिती बाहेर दिली जाते.शिक्षण विभागातील लिपिक सातत्याने गैरहजर असतो.पर्यायी लिपिक दिला जात नाही.
तसेच एका पदवीधर शिक्षकाने पदोन्नतीसाठी चार वेळा विनंती अर्ज केला होता परंतु शिक्षण विभागातून त्या अहवालातील नस्ती गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.हे प्रकरण ताजे असतानाच एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचाही छेडछाड प्रकरणातील चौकशी समितीचाही अहवाल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा पद्धतीने शिक्षकांच्या तक्रारी आणि बदलीचे प्रस्ताव गायब होत आहेत याला केवळ लिपिक जबाबदार नसून शिक्षण अधिकारी देखील तेवढेच जास्त जबाबदार आहेत.
अशा पद्धतीने तक्रारी व नस्ती गायब होणे यामागे काही आर्थिक हितसंबंध नाहीत ना याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण केवळ लिपिकांना दोषी न ठरवता शिक्षण अधिकारी यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व शिक्षण विभाग सुरक्षित राहावा याकरिता तात्काळ शिक्षण विभागात CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत याबाबत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले आहे.