वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी राज कुमार यांची निवड
बारामती : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष पदी राज यशवंत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पुणे पूर्व जिल्हा कार्यकारिणीचे पत्रक प्रसिध्द करून वंचितकडून ही माहिती जाहिर करण्यात आली आहे.
२०१९ रोजीच्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीत माढा लोकसभा निरीक्षक पदी व माळशिरस विधानसभेचे उमेदवार राहिलेले राज कुमार यांनी निर्णायक मते घेतल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. गत लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील अल्पावधित काळात गावपातळीवर युवकांची मोट बांधून केलेल्या संघटन कौशल्यामुळे कुमार यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागल्याचे राजकिय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.
आगामी ग्रामपंचायत,नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे पूर्व जिल्हात वंचितकडून राज कुमार यांच्या माध्यमातून जोर लावण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे .इंदापूर,बारामती,दौड तालुक्यात त्यांच्या दांडगा जनसंपर्काचा फायदा वंचितला नक्कीच होईल यात शंका नाही.