शिक्षक बँकेच्या २१ पैकी २० जागा जिंकत; स्वाभिमानी शिक्षक मंडळाची एकहाती सत्ता
अकलूज : प.महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे सहा हजारावर प्राथमिक शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेली सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी सेवा मंडळाचे बारा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत स्वाभिमानी शिक्षक मंडळाने २१ पैकी २० जागा जिंकत बँकेवर एक हाती विजय मिळवला. पहिल्यांदाच शिक्षक बँकेच्या इतिहासात सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकाने वज्र मुठ बांधत निवडणूक लढवली होती.
शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी सेवा मंडळ आणि शिक्षक संघ गट पुरस्कृत स्वाभिमानी शिक्षक मंडळ यांच्यात चुरशीची निवडणूक झाली. रविवार दि. ३ जुलै २०२२ रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ३४ मतदान केंद्रावर एकूण ६९५३ पैकी ५९६१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.यानंतर अल्पावधित लागलेल्या निवडणुकीचा निकालाने स्वाभिमानी शिक्षक मंडळ हे बँकेवर विराजमान झाल्याने सर्वत्र जल्लोष सुरु झाला आहे.
या निवडणुकीत सर्व सभासदांनी दिलेला कौल मान्य असून सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी बँकेचे हित जोपासात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पुरोगामी सेवा मंडळाकडून करण्यात आले.
