मी सावित्री बोलतेय

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुणीतरी एक मार्गदर्शक दीपस्तंभासारखा उभा असतो. आपल्या बोलण्यावर, वागण्यावर, आपल्या विचारांवर त्या व्यक्तीचा विशेष प्रभाव जाणवतो.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्या व्यक्ती वेगवेगळ्या असू शकतात. कधी कधी तर तर काही लेखक,समाजसुधारक यांच्या विचारांचा, लेखनाचा मनावर खूप मोठा पगडा असतो. इतिहासाचा अभ्यास करतांना,समाजसुधारक वाचताना अशीच एक व्यक्तिरेखा माझ्या आयुष्याच्या वळणावर मला भेटली. पुस्तकांतून,त्यांच्या अविश्वसनीय कार्यातून…. जसं जसं त्यांच्या विश्वात जाऊन समजावून घेता येईल तितकी ती व्यक्तिरेखा स्वतः मध्ये रुजत गेली. ती व्यक्तिरेखा म्हणजे थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. मी त्यांच्याविषयी काय बोलणार ज्यांना संपूर्ण देश वंदन करतो.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे एक धगधगती मशाल. संपूर्ण स्त्री जातीचा कायापालट करणारी, अखिल विश्वाला स्वतः च्या ज्ञानाच्या ज्योतीचा प्रकाश दाखवणारी ती एक प्रज्वलित ज्योत.त्यांच्यामुळेच स्त्री शिकली, लिहीती झाली, बोलती झाली. आज माझ्या लेखणीची धारही या ज्योती मुळेच तर आहे. त्याच सावित्रीचा वारसा जपत एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी ठरवलं एकदा ‘ मी सावित्री बोलतेय,’ करायचं. अर्थात ही सुरूवात माझ्या विद्यार्थ्यांसमोर . दरवर्षी 3 जानेवारीला सावित्री सादर करतांना प्रत्येक वेळीं ती मला वेगळी दिसली. प्रत्येक क्षणाला वेगळ्या रूपात भेटते. मला नेहमी भेटते ती माझ्यात,समाजातल्या प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रीमध्ये, अगदी शेतात काम करणाऱ्या महिलेत, ऊसतोड मजुरी करणाऱ्या प्रत्येक बाईत दिसते नेहमी वेगळीच सावित्री. तुमच्या माझ्या सगळ्यात आहे ती आजही विराजमान. पहिली महिला शिक्षिका म्हणून काम करतांना ती लढली, झगडली समाजाशी… खाल्ले तिने दगडधोंडे फक्त आपल्या सर्वांसाठी. कितीही सोसल्या यातना तरी ती माऊली म्हणायची,”परमेश्वरा यांना क्षमा कर, त्यांना समजत नाही ते काय करतायत.”
आज स्वतः ला पुरोगामी म्हणणाऱ्या आपल्या समाजाकडून आजच्या सावित्रीला त्रास होत नाही का? जेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीच्या उच्च शिक्षणाच्या परवानगीचे पत्र आमच्याच एका बांध वां कडून फाडले जाते… तेव्हा झालेल्या यातना मी फक्त त्या सवित्रिलाच सांगू शकते. तेव्हा ती बोलते माझ्याशी, सांगते मला.. जाऊ दे क्षमा कर.. त्यांना माहीत नाही.. आज ते काय करतायत… त्यामुळेच माझ्या नसानसांत भिनलीय सावित्री. तीच देते मला जगण्याचं बळ, प्रेरणा आणि आत्मविश्वासही. प्रत्येक वर्षाच्या 3 जानेवारीला आठवते सगळ्या समाजाला सावित्री आणि मग महिनाभर होतो जयजयकार… तेव्हा हसत असेल ना सावित्रीमाई आणि म्हणत असेल, “का असा कोरडा उत्सव साजरा करताय माझ्या जन्माचा… करायचंच असेल तर काम करा ना माझ्यासारखं.”.. आज इतक्या वर्षांनी आठवतंय समाजाला या क्रांतिज्योतीचे नाव विद्यापीठाला द्यायला आणि तिचा जन्मदिवस ‘ शिक्षिका दिन ‘ म्हणून साजरा करायला… पुन्हा आजही ती मनात किंचित हसत असेल आणि म्हणत असेल,’ परमेश्वरा यांना माफ कर..’
मलाही प्रत्येक वर्षाच्या तिच्या जन्मदिनी ती नव्याने उमगते, समजते.. ती असते प्रत्येक वेळी माझ्यात, बोलते ती माझ्याशी, माझ्याच रूपानं पुन्हा सावित्री होऊन.. आणि ठरवते मी आजच्या सावित्री आणि सावित्रीच्या लेकिंसाठी खूप काम करायचंय… त्या सावित्रीला मूलबाळ होत नाही म्हणून समाजाने हिणवलं तरी ती खंबीरपणे लढली, जगली कितीतरी अनाथ आणि अस्पृश्यांसाठी …. बनली त्या सर्वांची आई स्वतः समाजाच्या दृष्टीने वांझोटी असताना…. मलाही ‘मुलगा ‘ नाही म्हणून हिणावणारे आहेतच की याच समाजात…. सगळी इस्टेट जावयाला देणार का? असं विचारणारेही आहेतच की माझ्याच अवतीभोवती…माझ्या मनाचे ओरखडे न पाहता…. पुन्हा तीच सावित्री मला समजावते, प्रेरणा देते म्हणते मला,” खूप काम करायचंय अजून.. इतक्याने खचून जाऊ नकोस ग… त्यांना क्षमा कर… त्यांना समजत नाही ते काय करतायत….. जाणीव होईल तुझीही त्यांना… भेटशील तू रोज नव्याने, उमगशील तूही त्यांना एक दिवस तुझ्या कर्तृत्वाने… याच समाजाला…. फक्त धीर धर.. अशी खचू नकोस.. मी आहे ना तुझ्यासोबत…. तुझ्यातच सावित्री होऊन…”.

डॉ. उषा भोईटे पवार लेखिका, कवयित्री, शिक्षणतज्ञ निमगाव केतकी,इंदापूर मो.न.9890376649